प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात दर महिन्याला येणारा एक नैसर्गिक टप्पा म्हणजे पाळी – म्हणजेच मासिक धर्म. काही महिलांसाठी ही वेळ अगदी सामान्य असते, तर काहींसाठी ही वेळ खूपच त्रासदायक ठरते. पोटदुखी, पाठदुखी, चिडचिड, थकवा, मूड स्विंग्स, भूक वाढणे किंवा कमी होणे, अशक्तपणा – असे अनेक शारीरिक आणि मानसिक बदल या काळात होतात.
या काळात स्त्रियांनी स्वतःची विशेष काळजी घेणे खूप गरजेचे असते. शरीरातील हार्मोनल बदल, रक्तस्रावामुळे होणारी थकवा आणि भावनिक अस्वस्थता यामुळे योग्य आहार, स्वच्छता आणि मानसिक समज आवश्यक ठरते. जर या काळात योग्य काळजी घेतली नाही, तर शरीर कमजोर होऊ शकते आणि इतर आरोग्य समस्याही उद्भवू शकतात.

या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत की पाळीच्या काळातील आरोग्य टिप्स, कोणता आहार घ्यावा, कोणते पदार्थ टाळावेत, स्वच्छता कशी राखावी, आणि मानसिक तणाव कसा कमी करावा.
Table of Contents
पाळीच्या काळातील 10 सर्वोत्तम आरोग्य टिप्स
१. शरीराची स्वच्छता राखा
पाळीच्या काळात शरीर स्वच्छ ठेवणे सगळ्यात महत्त्वाचे आहे. सतत रक्तस्राव होत असल्याने भाग ओला राहतो. त्यामुळे बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता जास्त असते. जर स्वच्छता नीट राखली नाही, तर इंफेक्शन होऊ शकते.

पॅड, टॅम्पून किंवा मेंस्ट्रुअल कप वापरत असाल, तर त्याचा वेळोवेळी बदल करा. दर ४-६ तासांनी पॅड किंवा टॅम्पून बदला. जर वास येत असेल किंवा ओलसरपणा सतत वाटत असेल, तर त्वरीत बदल करा.
साफसफाईसाठी फक्त कोमट पाणी आणि सौम्य साबण वापरा. अती रसायनयुक्त वॉश किंवा स्प्रे टाळा. योनीचा भाग नैसर्गिकरित्या स्वच्छ होतो. त्यामुळे फारशा क्लिनिंग प्रॉडक्ट्सची गरज नसते. कोरडे, स्वच्छ अंडरवेअर घाला आणि दिवसातून किमान एकदा तरी अंघोळ अवश्य करा.
२. पाणी पिण्याचे प्रमाण वाढवा
पाळीच्या वेळी शरीरात खूप बदल होतात. शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. दिवसातून ८-१० ग्लास पाणी जरूर प्या.

त्याचबरोबर लिंबूपाणी, नारळपाणी, ताजे फळांचे रस, सूप यांचा वापर करा. पाण्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात. त्वचा सुद्धा स्वच्छ राहते आणि थकवा कमी होतो. काही स्त्रियांना पाळीच्या वेळी डोकेदुखी होते, त्यासाठीही पाणी उपयुक्त ठरते.
३. योग्य आहार घ्या
पाळीच्या वेळी आहार खूप महत्त्वाचा असतो. काही स्त्रियांना खूप भूक लागते, काहींना काही खायची इच्छा होत नाही. पण या काळात शरीराला पोषणद्रव्यांची खूप गरज असते. त्यामुळे खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष करू नका.

पाळीच्या काळात खावे असे काही पदार्थ:
- हिरव्या भाज्या: पालक, मेथी, कारली – आयर्न आणि फायबरसाठी उत्तम
- फळे: केळी, पपई, सफरचंद, संत्री – एनर्जीसाठी उपयोगी
- सुकामेवा: खजूर, बदाम, अक्रोड – अशक्तपणा कमी होतो
- डाळी आणि कडधान्ये: प्रोटीन मिळते
- गूळ आणि तीळ: रक्तवाढीसाठी उत्तम
- गडद चॉकलेट: मूड स्विंग्ससाठी फायदेशीर
टाळावेत असे काही पदार्थ:
- जास्त तेलकट आणि तळलेले पदार्थ – पचनावर ताण येतो
- कोल्ड ड्रिंक्स आणि जास्त थंड पदार्थ – पोट दुखू शकते
- कॅफीन – चहा आणि कॉफी थोडक्यात घ्या, कारण त्याने शरीर कोरडे पडते
- अत्यंत गोड गोष्टी – शरीर फुगलेले वाटू शकते
४. थोडीशी हालचाल ठेवा
काही स्त्रियांना पाळीच्या वेळी झोपून राहायला आवडते. काहीजणी खूप अशक्त वाटते म्हणून काहीच करत नाहीत. पण अशावेळी थोडीशी हालचाल केल्यास फायदा होतो.

हलकी फुलकी योगासने, स्ट्रेचिंग किंवा चालणे – हे केल्याने पोटदुखी कमी होते, मूड सुधारतो आणि शरीरातले ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते. खूप जोरदार वर्कआउट टाळा, पण ताण न घेता हलकं व्यायाम जरूर करा.
योगासाठी उपयुक्त आसने:
- सुप्त बद्धकोणासन
- बालासन (Child pose)
- सुप्त मत्स्यासन
५. झोप पूर्ण घ्या
पाळीच्या काळात शरीर थकलेले असते. हार्मोनल बदलांमुळे झोपेचा त्रास होऊ शकतो. पण झोप पूर्ण मिळाली नाही, तर चिडचिड वाढते आणि थकवा कमी होत नाही. त्यामुळे दिवसात ७-८ तास तरी झोप घेणे आवश्यक आहे.
झोप येत नसेल, तर मोबाईल दूर ठेवा, पुस्तक वाचा, कोमट दुध घ्या किंवा सौम्य संगीत ऐका. रात्रभर नीट झोप झाली, की पाळीचा त्रास सुद्धा कमी जाणवतो.
६. भावनिक समजूत द्या – मूड स्विंग्स नियंत्रित ठेवा
पाळीच्या वेळी काही स्त्रियांना खूप चिडचिड, रडू येणे, नैराश्य वाटणे असे अनुभव येतात. हे हार्मोन्समुळे घडतं. त्यामुळे स्वतःला दोष देऊ नका. हे नैसर्गिक आहे.

मूड सुधारण्यासाठी:
- आवडती गाणी ऐका
- मनापासून गप्पा मारा
- मनाला उभारी देणारी पुस्तकं वाचा
- गरज वाटल्यास सायकॉलॉजिस्टची मदत घ्या
स्त्रियांनी एकमेकींना आधार द्यावा. पाळीबाबत उघडपणे बोलावं, कारण मानसिक स्वास्थ्य हे सुद्धा आरोग्याचाच एक भाग आहे.
७. पाळीविषयी गैरसमज दूर करा
अनेक समाजांमध्ये अजूनही पाळीला अपवित्र मानलं जातं. या काळात स्त्रियांना स्वयंपाकात जाऊ नको, मंदिरात जाऊ नको, कोणालाही स्पर्श करू नको असे नियम लादले जातात. हे चुकीचे आहे.
पाळी ही एक जैविक प्रक्रिया आहे. ही कोणतीही लाज वाटण्याची किंवा गुप्त ठेवण्यासारखी गोष्ट नाही. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्त्री सक्षम होण्यासाठी समाजाने हे गैरसमज दूर करणे आवश्यक आहे.
८. पाळी नियमित नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या
कधी कधी पाळी वेळेवर येत नाही, किंवा खूपच कमी/जास्त रक्तस्राव होतो, किंवा प्रचंड वेदना होतात. अशा वेळी तो त्रास दुर्लक्ष करू नका.

कधी डॉक्टरांशी संपर्क साधावा:
- पाळी महिन्याला एकदाही येत नाही
- खूप जास्त किंवा खूप कमी रक्तस्राव होतो
- ७ दिवसांपेक्षा जास्त पाळी सुरू राहते
- जास्त कमजोरी, चक्कर येणे, घाम येणे यांसारखी लक्षणं
वेळीच निदान केल्यास बरेच आरोग्य प्रश्न टाळता येतात.
निष्कर्ष – स्वतःवर प्रेम करा
पाळीच्या काळात शरीर तुमच्याशी संवाद करत असतं. त्याची गरज ओळखा, त्याला योग्य पोषण द्या, आणि थोडं थांबून स्वतःची काळजी घ्या. हे दिवस काही त्रासदायक नसावेत, तर स्वतःला समजून घेण्याचे दिवस असावेत.
तुम्ही पाळीच्या वेळी व्यवस्थित खाल्लं, झोप घेतली, स्वच्छता पाळली आणि थोडा वेळ स्वतःसाठी काढला – तर तुम्ही एक समर्थ स्त्री म्हणून अधिक बळकट व्हाल.